Thursday, February 22, 2024
Homeचंद्रपुरकेंद्रीय रेल्वेमंत्र्यांसोबतची चर्चा फलदायी**चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे समस्या लवकरच मार्गी- हंसराज अहीर*

केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसोबतची चर्चा फलदायी*
*चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे समस्या लवकरच मार्गी- हंसराज अहीर*

चंद्रपूर / यवतमाळ :- चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील रेल्वेप्रवाशांना मुंबई, पुणे व देशातील अनेक शहरांमध्ये प्रवास करतांना उद्भवत असलेल्या अडचणींबाबत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे विद्यमान अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी विस्तृत चर्चा केली. यावेळी रेल्वेमंत्र्यांनी दोन्ही जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांचे निराकरण केले जाईल तसेच महत्वपूर्ण गाड्यांचे थांबे विस्तारीकरण व साप्ताहिक गाड्या, दैनिक स्वरुपात सोडण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे मान्य केले.
दिनांक 06 जानेवारी 2023 रोजी हंसराज अहीर यांनी रेल्वेमंत्र्यांची त्यांच्या दालनात भेट घेवून कोरोना संक्रमण काळात बंद झालेल्या व अजूनही सुरु न केलेल्या गाड्यांविषयी खंत व्यक्त करित चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना न्याय देण्यासाठी सर्व महत्वपूर्ण गाड्या पुन्हा सुरु करण्यात याव्यात असा आग्रह धरला. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाशांना देशात कोणत्याही राज्यामध्ये जाण्याकरिता रेल्वेच्या मुबलक सोई-सुविधा उपलब्ध होत्या परंतु कोरोना काळात बंद पडलेल्या गाड्या पूर्ववत सुरु न झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांना प्रचंड अडचणी व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे अहीर यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले.
भद्रावतीवासियांच्या उपोषणाची रेल्वेमंत्र्यांव्दारे दखल.
या भेटीत हंसराज अहीर यांनी भांदक (भद्रावती) वासियांकडून प्रमुख एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्यासाठी आंदोलन उभारण्यात आल्याची बाब मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणली. रेल्वेमंत्र्यांनी या आंदोलनाची दखल घेत आवश्यक गाड्यांचे थांबे भांदक या तीर्थस्थळी असलेल्या स्थानकावर सुरु केले जातील असे आश्वासन अहीर यांना दिले. सदर आंदोलन मागे घेण्यास पुढाकार घ्यावा असेही सुचविले त्यामुळे हंसराज अहीर यांनी दिल्लीहून परततांना उपोषण मंडपास भेट देवून हे आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्याने आंदोलकांनी अहीरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लिंबूपाणी घेऊन उपोषणाची सांगता केली. भद्रावतीकरांच्या मागण्यांची पूर्तता लवकरच केली जाईल असे भरीव आश्वासन दिले. या आंदोलनात राहुल सोनटक्के, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, भाजपा नेते, चंद्रकांत गुंडावार, प्रशांत डाखरे, विजय वानखेडे, प्रविण सातपुते, अॅड. सुनिल नामोजवार, किशोर गोवारदिपे गोविंदा बिजवे, गोपाल गोसवाडे, विनोद पांढरे, विवेक सरपटवार, इमरान खान व अन्य आंदोलकांची उपस्थिती होती.
बल्लारशाह स्थानकातील पिटलाईनमुळे थेट गाड्या सोडणे शक्य
दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केल्यानंतर हंसराज अहीर यांनी विविध मागण्यांचे निवेदन मंत्र्यांना सादर केले यांत प्रामुख्याने कोरोना काळात बंद झालेल्या आनंदवन तसेच ताडोबा एक्सप्रेस सुरु करुन दोन्ही गाड्या प्रतिदिन चालविण्यात यावे, बल्लारशाह – मुंबई व्हाया वर्धा साप्ताहिक ट्रेन दररोज चालवावी, काजिपेठ मुंबई व्हाया आदीलाबाद (साप्ताहीक ) बल्लारशाह येथुन सुरु करुन दररोज चालवावी, काजिपेठ – पुणे एक्सप्रेस आठवड्यातुन तीन दिवस चालविण्यात यावी. नंदीग्राम एक्सप्रेस जी आदीलाबादपर्यंत सुरु आहे तिचा बल्लारशाह पर्यंत विस्तार करुन चालविण्यात यावी, चांदा फोर्ट चंद्रपूर रेल्वे स्टेशन ला जोडण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे. बल्लारपूर स्थानकावर पिटलाईनचे काम पूर्ण झाल्यामुळे बल्लारशाह स्थानकावरुन गाड्या सोडणे आता शक्य असल्याचे अहीर यांनी या चर्चेप्रसंगी सांगितले. रेल्वेमंत्र्यांनी यावेळी मंत्रालयीन अधिनस्थ अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले असुन सदर भेट फलदायी ठरल्याचे अहीर यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments