काही स्थळांना हजारो वर्षांचा पुरातन इतिहास असतो, काही ठिकाणे किल्ले आणि लढायांमुळे प्रकाशझोतात येतात तर कुठे रेल्वेमुळे औद्योगिक विकास होतो. आज आपण पूर्व विदर्भातील एका वैशिष्टपूर्ण नगराबद्दल जाणून घेऊ जिथे मोठे कारखाने नाहीत, किल्ले किंवा लढायांचा इतिहासही नाही. पण तरीही एकेकाळी संपूर्ण देशात याचा नावलौकिक होता.
सिंदेवाही हे लहानसे नगर नागपूर-नागभीड- मुल-चंद्रपूर या प्रमुख राज्य मार्ग क्र ९ वर, आणि गोंदिया- नागभीड- चांदा या रेल्वे मार्गावर नागपूरपासून १३० किमी आणि चंद्रपूर पासून ७० किमी अंतरावर वसलेले आहे. नुकतेच नगर पंचायत झाले असले तरीही, कागदोपत्री केवळ १२,९१४ लोकसंख्या असलेले व सभोवतीच्या वस्त्या जोडून १५ ते २० हजार लोकसंखेचे हे कुठल्याही अन्य तालुक्यासारखे हे लहान नगर आहे.
सिंदेवाहीचा सर्वात जुना उल्लेख नागपूरचे पहिले रघुजीराजे भोसले याचे नातू व्यंकोजी भोसले यांच्या काळात (ई स १७८८) मिळतो. व्यंकोजी यांचे लग्न गुजर घराण्यातील मुलीशी झाले आणि त्यांचे भाचे ‘गुजाबादादा गुजर’ यांना भेट म्हणून त्यांनी सिंदेवाही या गावाची मालगुजारी दिल्याचे उल्लेख आहेत. पुढे ब्रिटिशकाळात नागपूरला राहणारे नवलोजी गुजर इथले मालगुजार होते. सिंदेवाही नाव कुठल्या शिंदे घराण्यावरून आले कि सिंदी नावाच्या झाडांवरून पडले याचा मात्र खात्रीशीर पुरावा उपलब्ध नाही.
त्याआधी हे गाव तेथून ७ किमीवर असलेल्या ‘गडबोरी’ परगण्यात एक लहानसे खेडे होते. एकेकाळी गोंड व नंतर मराठ्यांच्या राजवटीत एक प्रमुख परगणा असलेल्या गडबोरीची आता रया जाऊन आज ते केवळ एक दुर्लक्षित व दुर्गम खेडे म्हणून उरले आहे. पूर्वी तेथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात तेलुगु भाषिक विणकर आणि ब्राम्हण वस्ती होती. परंतु मुख्य रस्त्यापासून आत असल्याने आणि सुरुवातीच्या ब्रिटिशकाळात फक्त ते नावालाच परगणा उरल्याने सर्व वस्ती सिंदेवाहीला आणि अन्य ठिकाणी स्थलांतरित झाली. गोंड राज्यांनी गडबोरी, सिंदेवाही, नवरगाव परिसरात ‘कोहळी’ या मेहनती जमातीला तलाव बांधून घेण्यासाठी आश्रय दिला. हिरालाल व रसेल यांच्या पुस्तकानुसार बनारस किंवा काशी या भागातून आलेल्या कोहळी लोकांना ऊस लागवडीचा भारी छंद होता आणि त्यांनी या सुपीक भागाला अनेक तलाव बांधून ‘गुळाचे आगार’ म्हणून प्रसिद्धीस आणले.
ऊस, त्यापासून बनवलेला गुळ, धानशेती, कापड आणि थोडाफार रेशीम व्यवसाय यांच्यामुळे सिंदेवाहीची आर्थिक भरभराट होऊ लागली. पण नंतर इंग्रजांच्या आर्थिक साम्राज्यवादी धोरणांमुळे इतर शहरांप्रमाणे इथलाही हातमाग व्यवसाय डबघाईला आला. १८६१ या वर्षी ४३५६ लोकसंख्या असणाऱ्या सिंदेवाहीची लोकसंख्या १८९१ पर्यंत स्थलांतर व दुष्काळामुळे उलट कमी होऊन ३९५१ झाली. १८९६ व १८९९ वर्षीच्या दोन भीषण दुष्काळात आणि रोगराईमुळे १९०१ साली सिंदेवाहीचा आकार अर्धा होऊन फक्त २९३२ लोकंच इथे उरली होती, त्यातही तेलुगु भाषिकांची संख्या निम्याहून अधिक होती.
मागील भीषण दुष्काळाचा आणि त्यामुळे झालेल्या प्राणहानीचा अनुभव गाठीशी असल्याने भविष्यातील दुष्काळामुळे होणारी हानी टाळण्यासाठी मध्य प्रांताच्या ब्रिटिश सरकारने १९०५ च्या आसपास असोला मेंढा, घोडाझरी आणि नलेश्वर या जलाशयांचे योजना आखली. सोबतच १९११ ला नागपूर- नागभीड रेल्वे राजोली पर्यंत आणली आणि १९१३ ला सिंदेवाही चांद्याशी जोडले गेले. तेव्हाच बाजूच्या तळोधीला असणारे पोलीस ठाणे सिंदेवाहीला आणले गेले आणि तळोधीला पोलीस ठाण्यासाठी पुढची १०० वर्ष वाट पहावी लागली.
तत्पूर्वी इंग्रज सरकार इथल्या ‘गुळ’ उत्पादनावर १८२० पासून लक्ष ठेवून होते आणि त्यासाठी त्यांनी १९१२-१३ या हंगामात सिंदेवाहीला १५० एकराच्या वर जागा घेऊन ‘Agriculture farm’ किंवा आजच्या ‘कृषी संशोधन केंद्रा’ची स्थापना केली. ब्रिटिश अधिकारी इथे ऊस, कापूस आणि धानाच्या नवीन प्रजातीवर संशोधन करीत असत. सोबतच कीटकशास्त्र, माती यावर सुद्धा संशोधन होत असे.
या भागात कित्येक शतकांपासून ऊसाच्या रसाला तापवून गुळ तयार करायच्या भट्ट्या वापरात होत्या. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यात काही बदल करून ‘सिंदेवाही भट्टी (Sindewahi furnace)’ हे नाव देऊन जगप्रसिद्ध केले. तत्कालीन नियतकालिकांमध्ये यावर एक दोन नाही तर शेकड्याने प्रबंध प्रकाशित झाले आहेत. कमी खर्च आणि कमी इंधनात जास्त गुळ बनवणारऱ्या या भट्टीची सुरुवातीला पुणे परिसरातील ‘Poona Furnace’ सोबत तुलना होऊ लागली. तुलनेने सिंदेवाही भट्टीचे फायदे अधिक असल्याने भारतभर सर्व शेतकरी संमेलनांमध्ये त्याचीच प्रात्यक्षिके व्हायची. नवीन येणाऱ्या प्रत्येक भट्टीचा तुलनात्मक अभ्यास आधी सिंदेवाही भट्टीसोबतच होत असे. मद्रास, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या भागात शेतकऱ्यांना ‘सिंदेवाही भट्ट्या’ बांधून देण्यात आल्या. मात्र नंतर पुढे यांत्रिकीकारणामुळे अश्या भट्या कालबाह्य झाल्या.
‘सिंदेवाही क्रॉस’ नावाच्या कपाशीच्या नवीन प्रजातीचा शोधसुद्धा इथेच लागला. ही प्रजातीसुद्धा फार प्रसिद्ध झाली. अगदी अलीकडच्या काळापर्यंत ‘सिंदेवाही’ नावाच्या धानाच्या प्रजातीसुद्धा शेतकऱ्यांच्या विशेष आवडीच्या होत्या. ‘सिंदेवाही’ हे देशातील कदाचित एकमेव गाव असावे ज्याच्या नावे उसाची भट्टी, कापूस व धानाच्या प्रजातीची नावे आहेत. १९२२ ला तत्कालीन मध्य प्रांताचे गव्हर्नर सर फ्रॅंक स्ली हे घोडाझरी भागात शिकारीदरम्यान आले असताना त्यांनी येथील संशोधन केंद्राला भेट दिली होती. हे सर्व संशोधन ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सिंदेवाहीला वीज नसताना होत असे. सिंदेवाहीला वीज मात्र फार नंतर म्हणजे १९ जानेवारी १९५९ या दिवशी आली.
स्वातंत्र्यानंतर हे कृषी संशोधन केंद्र पुढे भारत सरकारने ‘ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र आणि कृषी संशोधन केंद्र’ म्हणून विकसित केले. आजही हे केंद्र सिंदेवाहीची खासियत म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेकांना हे माहित नसेल पण सिंदेवाहीला मलेरियावरसुद्धा संशोधन झालेले आहे. कधीकाळी मलेरिया नियंत्रणासाठी वापरात असलेल्या ५०% बेन्झीन हेक्झाक्लोराईड फवारणीचे सुरुवातीचे प्रयोग सिंदेवाहीलाच झाले होते.
आज मात्र हा भाग बेरोजगारीच्या विळख्यात अडकलेला आहे. एकेकाळी देशभर प्रसिद्ध असलेली गुळाची भट्टी असलेल्या भागात आज किलोभरही गुळ निर्माण होत नाही, ही या भागाची शोकांतिका आहे. गोसीखुर्द प्रकल्पाची सिंचन परियोजना व भविष्यातील नागपूर-नागभीड ब्रॉड गेज रेल्वेमार्गाने नागपूरशी होणारा त्वरित संपर्क कदाचित या प्रदेशाच्या अभ्युदयाची आशा पुन्हा उज्वल करील असा विश्वास वाटतो. प्रयोगशील शेतकरी आणि उद्यमशील युवक सिंदेवाहीचे गतवैभव पुन्हा खेचून आणतील अशी अपेक्षा करूया.
(लेखन – डाॕ. संजय चिलबुले, संपादन – अमित भगत)