मूल :-
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर फाउंडेशन व जलतरण संघटना मूल च्या वतीने झाडीपट्टीतील ज्येष्ठ नाट्य कलावंत पद्मश्री डॉ. परशुरामजी खुणे यांना केंद्र सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल दिनांक 23 जुलै ला दुपारी २:०० वाजता मा. सां. कन्नमवार सभागृह मुल येथे राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर- गोंदिया जिल्हा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित केला आहे.
या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष स्थानी नामदार सुधीर मुनगंटीवार हे लाभणार आहेत.
झाडीपट्टीतील नाट्यकलावंत व लोककलाकार पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांनी वयाच्या पंधरा वर्षापासून तर आजतागायात १५०० च्या वर नाटकात आपला दमदार अभिनय सादर करून रसिकांची मने जिंकलेली आहेत व झाडीपट्टीला समृद्ध केले आहे. ते झाडीपट्टीत हास्यकलावंत म्हणून सुपरिचित आहेत.
या कार्यक्रमात कोरोना काळात ग्रामीण भागात उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरविल्याबद्दल वयोवृद्ध डॉ.राम दांडेकर, संपूर्ण राज्यात दमारोगावर रामबाण औषध देणारे गडचिरोली जिल्ह्यातील कोकळी येथील वैद्य प्रल्हाद कावळे, मूल येथील निसर्ग संवर्धक व पर्यावरण प्रेमी सौ वर्षा भांडारकर, नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या राजकीय नेतृत्वावर शोध प्रबंध सादर करणारे तळोधी बाळापूर येथील प्रा. डॉ. दैवत बोरकर, आधुनिक हिंदी कविता मे स्वाधीनता की अभिव्यक्ती या विषयावर शोध प्रबंध सादर करणाऱ्या चंद्रपूर येथील प्रा. डॉ. तरन्नुम खान, जिम्नालॉजिकल स्टडी ऑफ लेक्स इन मुल तहसील वर शोध प्रबंध सादर करणाऱ्या प्रा.डॉ. राजश्री मुस्तिलवार तसेच बंजारा जातीच्या सामाजिक व आर्थिक स्थितीचे अध्ययन यावर शोध प्रबंध सादर करणारे प्रा. डॉ. विजयसिंग पवार यांचा तसेच मुल येथील सेट परीक्षा उत्तीर्ण करणारे शुभम सुधाकर डांगे, ओंकार सुभाष चन्नावार व रागिनी गणेश उमलवार यांचा सत्कार करण्यात येत आहे. कार्यक्रमात झाडीपट्टीतील साहित्यिक व सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुखदेव चौथाले यांच्या “झाडीचा पोहा” या काव्यसंग्रहाचे लोकार्पण होणार आहे.
या कार्यक्रमात प्रसिद्ध झाडीपट्टी नाट्यकलावंत व लोकगीत गायक अनिरुद्ध वनकर यांच्या “झाडीपट्टी लोकगीतांची मैफिल” हा कार्यक्रम सकाळी ११:३० वाजता होणार आहे. तरी मुल तालुक्यातील जनतेनी या कार्यक्रमास उपस्थित राहून आस्वाद घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाच्या आयोजकांनी केले आहे.