चंद्रपूर:
सार्वजनिक ठिकाणी रंगमंचावर सादर होणार्या प्रयोगाच्या
संहितांचे पूर्व परीक्षण पोलीस अधिनियम 1951 नुसार नाटक आणि इतर मनोरंजनाच्या
कार्यक्रमांच्या संहितांचे पूर्व निरीक्षण करून सदर कार्यक्रमांना योग्यता प्रमाणपत्र देवून गृहविभागाच्या अधिसूचनेद्वारे रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मंडळाकडे प्राप्त संहिताचे पूर्व निरीक्षण मंडळातील कला साहित्य क्षेत्रातील अनुभवी मान्यवरांकडून करण्यात येते व त्यानंतर योग्यता प्रमाणपत्र देण्यात येते. महाराष्ट्रातील छत्तीस मान्यवरांच्या यादीत अशासकीय सदस्य म्हणून जेष्ठ नाट्य लेखक दिग्दर्शक अणि रंगकर्मी सदानंद बोरकर यांची नागपुर विभागातून निवड झाली आहे. जेष्ठ रंगकर्मी विजय गोखले यांच्या अध्यक्षतेखाली हे मंडळ पुढील तीन वर्षे काम करेल. यापुर्वी चंद्रपूर जिल्हा वृद्ध कलावंत निवड समितीचे अशासकीय सदश्य म्हणुन त्यांनी पाच वर्षे काम केले आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या कार्यालयाकडून प्रसिद्ध झालेल्या पत्रकाद्वारे सदर निवड जाहीर करण्यात आली आहे.
सदानंद बोरकर यांच्या निवडीबद्दल तमाम रंगकर्मीनी आनंद व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले आहे. माझं कुंकू मीच पुसलं, आत्महत्या, अस्सा नवरा नको गं बाई, गंगाजमूना यासारखी सामाजिक नाटके लिहून सदानंद बोरकर यांनी समाज जागृती केलेली असून पैकी दोन नाटके गोंडवाना विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवडली आहेत. तसेच यापुर्वी त्यांच्या ‘आत्महत्या’ नाटकाची सार्क इंटरनॅशनल थिएटर महोत्सवासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केलेली ही निवड बोरकर त्यांच्या कार्याचा गौरव असल्याचे मत नाट्यरसिक आणि रंगकर्मीनी व्यक्त केले आहेत.