चंद्रपूर, दि. 20 ऑगस्ट : वेकोलीने उकणी शिव खंड एक मधील शेतीच्या आजूबाजूला मातीचे ढिगारे उभे केले आहे. नैसर्गिक नाल्याचाही प्रवाह वेकोलीच्या खाणीमुळे बंद झाल्याने सन 2019 पासून परिसरातील शेतात पाणी साचत आहे. कोळसा खाणीच्या चुकीच्या नियोजनामुळे येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे वेकोलीने येथील शेतकऱ्यांना आवश्यक ती नुकसान भरपाई त्वरित द्यावी, असे निर्देश वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
चंद्रपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात वे.को.ली, घुग्गुस संदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते.
मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, उकणी, निवली व लाठी या गावालगत व परिसरातील संपूर्ण शेती चार वर्षापासून पाण्याखाली जात आहे. त्यामुळे येथील जमीन शेतीलायक नाही. येथील शेतकऱ्यांना सन 2019 ते 2022 या चार वर्षापर्यंतची नुकसान भरपाई द्यावी. नुकसान भरपाई देताना चार वर्षाअगोदर येथील शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत मालाची विक्री केली असेल त्याचा आधार घ्यावा. भूधारकांना वोल्वो मध्ये 1 सप्टेंबरला नोकरी द्यावी. तसेच येथील भूमी अधिग्रहण करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी वेकोली अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री देवराव भोंगळे, वे.को.लि. वणी क्षेत्राचे जनरल मॅनेजर उदय कावळे, प्लॅनिंग ऑफिसर रोहित मेश्राम, अधीक्षक एम.वाय.पुरडकर तसेच संबंधित उकणी, निवली व लाठी या गावातील भुधारक प्रामुख्याने उपस्थित होते.