गडचिरोली : तेली समाजातील विद्यार्थ्यांनी महाज्योती सोबतच विविध योजना व संधीचा लाभ घेेऊन मार्गक्रमण करावे, असे आवाहन विद्यार्थी तेली समाज नागपूरचे युवानेते उमेश कोराम यांनी केले.
संताजी सोशल मंडळ गडचिरोलीतर्फे शालांत परीक्षेतील गुणवंत, स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेले व नवोदय, स्कॉलरशीप उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संताजी सोशल मंडळाचे अध्यक्ष प्रा. देवानंद कामडी तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार अविनाश भांडेकर, मंडळाचे सचिव गोपीनाथ चांदेकर, उपाध्यक्ष ॲड. रामदास कुनघाडकर, कोषाध्यक्ष राजेश ईटनकर, कार्याध्यक्ष रामराज करकाडे, सहसचिव अनिल बालपांडे, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, प्रभाकर वासेकर, सुरेश भांडेकर, माजी नगरसेवक प्रमोद पिपरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी उमेश कोराम यांनी केंद्र व राज्य सरकारच्या ओबिसी विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीप्रमाणे इतरही विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ तेली समाजातील विद्यार्थ्यांनी घेऊन आपले भविष्य घडवावे, इतर समाजाच्या तुलनेत या समाज आजही मागे आहे. राजकारणातही आपल्या समाजाचे नेतृत्व दुसऱ्याच्या हाती आहे. हे आता बदलविण्याची गरज आहे. यासाठी समाजातील युवकांनी पुढे येवून नेतृत्व करावे, विविध क्षेत्रात असलेल्या शैक्षणिक संधीचा लाभ घ्यावा, दिल्लीसारख्या ठिकाणी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा पूर्व तयारीसाठी जावून त्या ठिकाणी अभ्यासिकेद्वारा यश प्राप्त करावे, केवळ अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा असला तरी इतर क्षेत्रात करिअर करण्याची संधी सोडू नये, त्याचबरोबर शिक्षण झाल्यानंतर आपले कुटुंब व सामाजिक जबाबदारी जोपासण्याची आवश्यकता त्यांनी विशद केली.
यावेळी अविनाश भांडेकर यांनी हायस्कूलपासूनच आपले करिअरची सुरुवात करायची असते. कुठलेही क्षेत्र निवडताना मित्र-मैत्रिणी, आई-वडील, नातेवाईक यांच्याशी चर्चा करण्यासोबतच स्वत:शीही चर्चा करावी, आपली आवड काय आहे त्यानुसार करीअर निवडावे, अनेकदा एखाद्या क्षेत्रात अपयश आले तरी नैराश्यात न जाता दुसऱ्या क्षेत्राकडे वळण्याची संधी असते. अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर शिक्षकाच्या नोकरीसाठी प्रयत्न केला. मात्र, अपयश आल्याने कारकुणाची नौकरी स्वीकारली. मात्र, पुढे ते थोर भौतिकशास्त्रज्ञ म्हणून उदयास आले. त्यांचा सापेक्षतेचा सिद्धांत विचार देऊन गेला. ईलेक्ट्रानिक्स माध्यमामध्ये सुद्धा नोकरीच्या विविध संधी आहेत. या आज ॲन्करला असणाऱ्या कोट्यवधीचे पॅकेज आहेत. शिक्षण घेताना इतर बाबीकडे न पाहता केवळ आपल्या शैक्षणिक भविष्याचा विचार करावा, आज शहरात मुलांच्या आत्महत्येचे प्रमाण हा चिंतनाचा विषय असून यावर समुपदेश करण्याची आवश्यकता आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. देवानंद कामडी यांनी समाजातील विद्यार्थ्यांसाठी संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप, यासोबतच वधू-वर परिचय मेळावा, आरोग्य शिबिर आदी उपक्रम राबविले जात असल्याची माहिती दिली. माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी सामाजिक बांधिलकी कायम ठेवून विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य घडविणे आवश्यक आहे. संताजी सोशल क्लबने अशा उपक्रमातून निश्चितच विद्यार्थ्यांमध्ये नवचेतना जागृत करण्याचे काम केले आहे. भविष्यातही असे उपक्रम सुरू ठेवण्याची आवश्यकता त्यांनी विशद केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपिनाथ चांदेवार यांनी केले. संचालन रामराज करकाडे तर आभार सुधाकर लाकडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी महादेव वाघे, स्वप्नील सावरकर, सुधाकर दुधबावरे, विष्णू कांबळे, सुरेश निंबोरकर, शंकरराव कोठारे, भाऊराव मुडके, प्रा. निवृत्ती शेंडे, चंद्रकांत किरमे, प्रा. सुनील कामडी, पंढरी लाकडे, देवानंद मुजबैले, आनंदराव मदनकर, हेमंत खोब्रागडे, भाऊराव कुनघाडकर, दिनेश पुंडे, चंद्रकिशोर किरमे, ईश
ांत राडे, गुणाजी कुनघाडकर, भास्कर ठाकरे तसेच संताजी सोशल क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.