मुंबई, दि. १२ : स्वातंत्र्य आंदोलन इतिहास आधार साहित्य वाचकांना मातृभाषेतून उपलब्ध झाल्यास ते अधिक लोकांपर्यत पोहचण्यास मदत होते. त्यामुळे आज लोकार्पण करण्यात आलेले साहित्य मराठीत प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात यावेत अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
‘स्वातंत्र्य आंदोलन इतिहास आधार साहित्य खंड’ – १ ते १३ या मोबाईल ॲपचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज रवींद्र नाट्य मंदिर येथे लोकार्पण करण्यात आले.यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, विद्या वाघमारे, दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक आणि सचिव डॉ. दिलीप बलसेकर, पु.ल.देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे, पुरातत्व संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणाले की, दार्शनिका विभागाने दुर्मिळ साहित्य मोबाईल अॅप द्वारे उपलब्ध केले आहे याचा आनंद आहे. कारण या अॅपमुळे हे साहित्य आपल्या मोबाइलद्वारे आपल्या डोक्यापर्यंत पोहोचणार आहे. आपण कितीही पुढे जात असलो तरी आपला इतिहास आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे आणि हा इतिहास वाचण्यासाठी जर मातृभाषेतून उपलब्ध असेल तर ते आजच्या तरुणाईपर्यंत सहज पोहचू शकेल. त्यामुळे येणाऱ्या काळात आज लोकार्पण करण्यात आलेले साहित्य लवकरच मराठीत भाषांतरित करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिनस्त असणाऱ्या दर्शनिका विभाग आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या मोबाईल ॲपमध्ये आधुनिक भारताच्या इतिहासापासून मवाळवादी, जहालवादी कालखंडांचा समावेश करण्यात आला आहे. महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील सक्रिय सहभागातून उभी राहिलेली लोकचळवळ जसे असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, चलेजाव आंदोलन या सर्व महत्वाच्या घडामोडींची सखोल माहिती या १३ खंडांमधून अभ्यासकांना आणि वाचकांना मिळणार आहे.दर्शनिका विभागाकडून विविध ग्रंथ प्रकाशित करण्यात येतात. या सर्व प्रकाशित ग्रंथांच्या ई आवृत्ती सीडी स्वरुपात तर काही पेन ड्राईव्ह स्वरुपात उपलब्ध आहेत. सर्व ग्रंथ मोबाईल ॲप, संकेतस्थळ याबरोबरच केंद्र शासनाच्या इंडियन कल्चर पोर्टलवरुन अभ्यासकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो.
*कलाकार करतात हास्यदान पसरवण्याचे ईश्वरी कार्य*
आजच्या काळात कलाकार हा खूप मोठा आहे. कारण कला सादर करताना आपल्या समोर बसलेल्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम ते करतात. कलाकारांमुळे सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याचे काम होत असून रक्तदान, अन्नदान याप्रमाणे हास्यदान पसरवण्याचे ईश्वरी कार्य कलाकार करत असून या कलाकारांच्या मागे सांस्कृतिक कार्य विभाग पाठीशी उभा असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले.
*स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निवडक गीत रचनेवर “यशोयुताम् वंदे” कार्यक्रम*
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या रचनेवर आधारित “यशोयुताम् वंदे” कार्यक्रम या लोकार्पण सोहळ्यादरम्यान पुणे येथील कलासक्त संस्थेच्या २५ नृत्यांगना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अज्ञात पैलूवर आणि मराठी, हिंदी, उर्दू भाषेतील निवडक रचनेवर आधारीत “यशोयुताम् वंदे” कार्यक्रमाअंतर्गत शास्त्रीय नृत्य सादर करण्यात आला.